अमृता फडणवीसांची सरकारी बैठकांना उपस्थिती ? भाजपनं केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट लपून रहात नाही. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा आहे. यामध्ये त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका बैठकीत उपस्थित असल्याचे दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोवरून भाजपवर टीका करण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप करत होत्या का ? असा प्रश्न विचारला जात होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर आता भाजपने खुलासा केलाय. अमृता फडणवीस या कोणत्याही प्रशासकीय बैठकीला हजर नव्हत्या. हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्टीकरण माधव भंडारी यांनी दिले आहे. ती सरकारी कामासंदर्भातील बैठक नव्हती तर सामाजिक कामासंदर्भात काही लोक भेटायला आले होते. त्या संदर्भात ही बैठक होती असेही माधव भंडारी यांनी सांगितले.

याउलट सध्या सरकारी बैठकांना शासकीय पदावर नसलेल्या व्यक्ती हजर राहतात असा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकींना आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरून माधव भंडारी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही गोष्ट सरकारची प्रतिष्ठा कमी करणारी आहे. तसेच गोपनियतेचा भंग करणारी असल्याचे भंडारी म्हणाले.

Visit : policenama.com