खळबळजनक ! जावयाच्या खूनाची सुपारी देणार्‍या सासर्‍याची आत्महत्या, मुलीनं सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यासमोर हत्या करण्यात आली होती. 14 सप्टेंबर 2018 साली तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे ही घटना घडली होती. या हत्ये प्रकरणातील मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत, मुलीने प्रतिक्रिया देताना आम्हाला वडिलांच्या मृत्यूबद्दल कुणीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. तसेच टीव्हीवरील बातम्यांमधून आम्हाला याबाबत समजल्याचे मुलीने सांगितले.

घरच्यांच्या विरोधाला नाकारुन प्रणय आणि अमृताने पळून जाऊन विवाह केला होता. परंतु त्यांच्या सुखी संसाराला मुलीच्या जन्मदात्यांची नजर लागली. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केलं, याचा राग मनात धरुन मुलीच्या समोरच तिच्या प्रियकराचा निर्घुण खून करण्यात आला होता. सैराट चित्रपटाची कथा सत्यात उतरावी अशी घटना तेलंगणात घडली होती. त्यानंतर अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आजही मुलगी अमृता तिच्या सासरच्यासोबत राहत आहे. परंतु दोन दिवसांपूर्वीच तिच्या वडीलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

वडिलांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अमृताने फारसे दुख व्यक्त केले नाही. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की वडिलांच्या मृत्यूबाबत आम्हाला टीव्हीवरुन कळाले. प्रणयच्या मृत्यूनंतर माझं कुटूंबाशी काहीही बोलणं झालेलं नाही. कदाचित वडिलांना प्रणयच्या हत्येचा पश्चाताप झालेला असेल म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी.

शनिवारी रात्री खैरताबाद येथील आर्यवैश्य भवनमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत मारुतीराव यांनी विष पिऊन आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली आहे. तेलंगणातील ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी मारुती राव यांनी ख्रिश्चन दलित समाजातील पेरुमला प्रणयची हत्या करण्यासाठी 1 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर मारेकऱ्याने भर रस्त्यात अमृता देखत प्रणयवर वार केल्याचा भीषण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हैदराबादपासून 80 किलोमीटरवरील एका भव्य राजवाड्यात अमृता आणि प्रणयची प्री वेडिंग शूट झाली होती.