‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या अमूल्याचा दावा, म्हणाली – ‘माझ्या सोबत एक मोठी टीम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेंगळुरूमध्ये सीएएच्या विरोधात आयोजित मोर्चात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देणारी अमूल्या लिओनचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अमूल्या म्हणत आहे की ‘ती एकटी नाही, ती जे बोलतेय आणि करतेय यासाठी बरेच लोक काम करतात’. मात्र, हा व्हिडिओ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देण्यापूर्वीचा असल्याचे संगितले जात आहे.

दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत बंगळुरु येथे 19 वर्षीय अमूल्या लिओन हिने सीएएविरोधी रॅलीत स्टेजवरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी केली होती. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या घोषणेचा अमूल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेनंतर अमूल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

यांनतर आता अमूल्याचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये, अमूल्या म्हणते की, ‘मी जे करत आहे ते मी करत नाही. मी फक्त त्याचा चेहरा बनले आहे, मीडियामुळे. परंतु, बऱ्याच सल्लागार समिती माझ्यामागे काम करतात आणि ते जे सुचवित आहेत की आज भाषणात हे सांगावे लागेल, ते मुद्दे आहेत. यासाठी बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते काम करतात. ‘व्हिडिओमध्ये, अमूल्य पुढे म्हणते की ‘माझे पालक सांगतात की, असे बोलायचे आहे, असे करायचे आहे, इकडे जायचे आहे. या सर्व निषेधामागे बंगळुरू स्टूडंट अलायन्स – एक मोठा विद्यार्थी गट कार्यरत आहे. मी फक्त त्याचा चेहरा आहे, परंतु बंगळुरू विद्यार्थी खूप मेहनत घेत आहे’. दरम्यान, अमूल्याचा हा व्हिडिओ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणेपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केल्यावर चर्चेत आलेल्या अमुल्याबद्ल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सोशल मीडियापासून वास्तविक जीवनापर्यंत अमूल्यावर टीका झाली आहे. हिंसाचाराच्या रूपातही बर्‍याच लोकांना राग आला. गुरुवारी रात्री अमूल्याच्या घरावरही काही जणांनी हल्ला केला, ज्यामध्ये घराच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या गेल्या.