तिचे पाय तोडले तरी चालेल, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा ‘उद्वेग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एआयएमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून वादंग सुरु असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या बंगळुरुच्या सभेत एका तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे आणखीनच वादंग पेटले आहे.

बंगळुरूमधील सीएएविरोधी मंचावरून या तरुणीने या घोषणा दिल्या होत्या. तरुणीने अचानक माईक हातात घेऊन घोषणा दिल्याने ओवेसी आणि संयोजकांना चांगलाच धक्का बसला. अमुल्या लिओना असे या तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. अमुल्या लिओनाला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणानंतर तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. तिचे वडीलांनी सांगितले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने माझे ऐकले नाही. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका अशी संतप्त प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

ओवैसी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधातील रॅलीत सहभागी झाले होते. त्यावेळी अमुल्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या मध्यभागी अमुल्या स्टेजवर पोहचली आणि माईकवर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी ओवैसी स्वत: स्टेजवर उपस्थित होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संयोजक आणि ओवैसी यांची चांगलीच धावपळ झाली. त्यांनी तिच्या हातून माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमुल्याने माईक देण्यास नकार देत हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी स्टेजवर धाव घेत तिला अटक केली.