अनंतपूरमध्ये दोघा भावांवर खुनी हल्ला, दोघेही गंभीर

सांगली/संबरगी : पोलीसनामा ऑनलाईन

नातेवाईकांमध्ये असलेल्या पूर्ववैमनस्यातून अनंतपूर (ता. अथणी) येथे दोघा सख्ख्या भावांवर चाकू, कुर्‍हाडीने खुनीहल्ला करण्यात आला. दि. ०३ जून (रविवार) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी डफळापूर (ता. जत) येथील पाटोळे कुटुंबियातील पाचणांविरोधात अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक शिवाप्पा सनदी (वय 40), राजू शिवाप्पा सनदी (वय 30) गंभीर जखमी झाले आहेत. तर पोपट पाटोळे, पवन पाटोळे, अक्षय पाटोळे व अन्य दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अशी घडली घटना
पोटोळे व सनदी कुटुंबिय एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैर आहे. त्यातून त्यांच्यात वरचेवर वाद होत होता. सनदी बंधूंना संपवण्याचा चंग बांधून पाटोळे बंधू चाकू, काठ्या, कुर्‍हाडी घेऊन रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास अनंतपूर येथे गेले. पाचही संशयित गावाबाहेर असलेल्या सनदी वस्तीवर गेले. नंतर त्यांच्या घरात घुसले. नंतर त्यांनी अचानक दोघाही भावांवर जोरदार हल्ला केला. दोघांवरही चाकू, कुर्‍हाडीने वर्मी वार करण्यात आले आहेत. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. त्यानंतर दोघाही जखमींना अथणीतील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मिरजेतील सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक बी. सुरेश यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून समजले आहे.