जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये एन्काऊंटर, सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मागच्या काही दिवसात शोपियां जिल्ह्यात अनेक एन्काऊंटर झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हे एन्काऊंटर तुर्कुवगन गावात सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या या एकत्रित मोहिमेत दोन एके 47 आणि एक आयएनएसएएस रायफल जप्त केल्या आहेत.

शोपियां जिल्ह्यात मागच्या दहा दिवसांतील हे चौथे एन्काऊंटर आहे. यापूर्वी मागच्या बुधवारी शोपियांमध्ये झालेल्या एका एन्काऊंटरमध्ये पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष मोहिम पथक, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी शोपियांच्या सुगू हंदामाह गावात संयुक्त शोध मोहिम सुरू केली होती, ज्यामध्ये दशहतवाद्यांना ठार करण्यात आले.