100 दिवस झोपण्याचा पगार, भारतीय ‘स्टार्ट’अपनं ऑफर दिली 1 लाख पगाराची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) अवकाश अभ्यासाकरता दोन महिन्यांच्या झोपेसाठी १४ लाख रुपये देते. आता अशीच काहीशी गोष्ट भारतात सुरू होणार आहे. कर्नाटकमधील बेंगळुरूची (Bengaluru) ऑनलाइन कंपनी वेकफिट (Wakefit) ने म्हटले आहे की, रोज रात्री १०० दिवस सलग ९ तास झोपणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपये देण्यात येतील. ऑनलाइन स्लीप सोल्यूशन फर्मने आपल्या प्रोग्रॅमला स्लीप इंटर्नशिप (Sleep internship) असे नाव दिले आहे. जेथे निवडलेल्या उमेदवारांना १०० दिवसांसाठी रोज रात्री न चुकता तब्बल ९ तास झोपावे लागेल.

निवडलेले उमेदवार कंपनीच्या गाद्यांवर झोपतील. याबरोबरच ते स्लीप ट्रॅकर्स आणि तज्ज्ञांच्या समवेत काउन्सेलिंग सेशनमध्येही ते भाग घेतील. तथापि, ज्या लोकांना या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये शॉर्टलिस्ट केले जाईल त्यांना त्या कंपनीला एक व्हिडिओ पाठवावा लागेल ज्यामध्ये त्यांना किती झोपायला आवडेल हे सांगावे लागणार आहे.

स्लीप ट्रॅकरचा देखील वापर केला जाईल
या प्रक्रियेत एक स्लीप ट्रॅकर देखील वापरला जाईल जो इंटर्नशिपसाठी दिलेल्या गाद्यांवर झोपायला जाण्यापूर्वी आणि झोपी गेल्यानंतरचा पॅटर्न रेकॉर्ड करेल. विजेत्यांना हा स्लीप ट्रॅकर देखील देण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे संचालक आणि सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी म्हटले आहे की स्लीप सोल्यूशन कंपनी म्हणून आमचा पहिला प्रयत्न लोकांना झोपेसाठी प्रेरित करण्याचा आहे. एकीकडे आपली जीवनशैलीत बदल होऊन वेगवान पद्धतीने चालू आहे, तर दुसरीकडे कमी झोपेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता देखील कमी होत आहे.

ते म्हणाले की आम्हाला अशा लोकांची भरती करायची आहे जे आपल्या आयुष्यात झोपेला प्राधान्य देतात आणि ते दीर्घकाळ झोपू शकतात. ही इंटर्नशिप करण्यासाठी आपल्याला आपली नोकरी सोडावी लागणार नाही किंवा घराबाहेर देखील पडावे लागणार नाही.

आपल्यालाही हे इंटर्नशिप करायची असेल तर, यासाठी आपण कंपनीच्या वेबसाइट https://www.wakefit.co/sleepintern/ वर जाऊन अर्ज करा.

Visit : Policenama.com