Pimpri News : ATM कार्डचे क्लोनिंग करुन झारखंड, बिहारमधून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

चिंचवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिग करून त्या माहितीच्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यून पैसे काढणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन झारखंड आणि बिहार राज्यात ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे काढले. सायबर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वाकड आणि भोसरी येथील गुन्हे उघडकीस आले असून चार जणांना अटक केली आहे.

निखिल पाटील (वय-23 रा. देवास, मध्य प्रदेश), खालिद अन्सारी (वय-27 रा. धानोरी गावठाण, मुळ रा. टटकजोरी, करंजो देवघर, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमेश आन्वेकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बँक खात्यातून बिहार येथून पैसे काढले जात असल्याचे उमेश आन्वेकर यांनी फिर्यादीत म्हटले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून उमेश हे जेवणासाठी गेलेल्या लांडेवाडी येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या निखिल पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत उमेश यांच्या डेबिट कार्डची माहिती खालिद याला दिल्याचे सांगितले. खालिदने याची माहिती बिहारमधील त्याच्या साथिदारांना दिली. त्यांनी क्लोन डेबिट कार्ड बनवून उमेश यांच्या बँक खात्यातून 50 हजार काढले.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. या प्रकरणात सद्दाम हुसेन (वय-29) फुरकन अन्सारी (वय-32 दोघे रा. विशाल नगर, पिंपळे निलख, मुळ रा. झारखंड) या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी आकाश खोकर यांनी फिर्याद दिली आहे. खोकर यांच्या बँक खात्यातून 15 हजार 900 रुपये झारखंड येथून काढण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी हे विशालनगर येथील एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये काम करत होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून तीन डेबिट स्किमर, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिचेवार यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी घ्यावयाची दक्षता
1. हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल, दुकान किंवा इतर पी.ओ.एस असणाऱ्या ठिकाणी आपले डेबिट/क्रेडिट कार्ड आपल्या समोरच स्वाईप करण्याची मागणी करा. ते तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका.
2. एटीएम सेंटरमध्ये जाऊन आपले कार्ड वापरण्यापुर्वी तेथे एकदा कार्ड स्किमिंग स्लॉट लावला आहे का याची खात्री करावी.
3. पी.ओ.एस. असेल किंवा एटीएम सेंटरमध्ये आपला पिन दाखल करताना संबंधित मशिनचा की बोर्ड एका हाताने झाकून घ्या म्हणजे तो गोपनीय राहिल.
4. आपल्या कार्डद्वारे बिल पे करण्याकरता ते इतरांचे ताब्यात देऊन त्यांना कार्डचा पिन सांगू नका.
5. हॉटेल मालकांनी आपल्याकडे काम करणारे वेटर यांच्यावर लक्ष ठेवावे जेणे करु ते बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नाहीत.