पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतलं पेटवून !

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, येथील या उत्सवाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. एका वृद्ध नागरिकाने पोलीस स्टेशनमध्येच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल शिवाजी कदम (७०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ते या दुर्घटनेत ६० टक्क्यांहून अधिक भाजल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये अनिल कदम यांनी तीन दिवसांपूर्वी आपण २५ जानेवारी रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र दिले होते. पण, तेव्हा आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यात पोलिसांना अपयश आले होते. गेल्या वर्षी देखील अनिल कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अनिल कदम यांचा गणेशवाडीतील सादिक रज्जाक शेख व सुमय्या सादिक यांच्यासोबत जमिनीचे व्यवहार झाले होते. मात्र, जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नसल्याने दोघांत वाद झाले. शेवटी हा वाद कोर्टापर्यंत गेला. सादिक यांच्या कुटूंबाला घरातून बाहेर काढावे, अशी मागणी अनिल कदम करत होते. पंरतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पोलिसांनी यात हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली होती.

दरम्यान, अखेर आज सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्यामध्ये कदम हे ६० टक्के भाजले, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.