अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशयाग आणि स्वराभिषेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

ओम् गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवा गायक प्रथमेश लघाटे याने गायनसेवा दिली. त्यानंतर गणेशयाग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते यांसह विश्वस्त उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07BNVH1S1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9acf1284-94c5-11e8-98f8-c16de46aff90′]

सिद्धीविनायक ग्रुपचे राजेश सांकला यांच्यातर्फे १ लाख राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.  मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. अगदी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या अलिकडेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशचरणी प्रथमेश लघाटे याने भावगीते आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून केलेल्या स्वराभिषेकाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.