पॉइंटमन ‘जिगरबाज’ मयूर शेळकेंवर बक्षीसांचा अन् कौतुकाचा वर्षाव ! मध्यरेल्वेकडून 50 हजार तर JAVA कडून बाईक, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पॉइंटमन मयुर शेळके या 28 वर्षीय जिगरबाज तरुणाने मृत्यूच्या जबड्यातून चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर मयुरने दाखवलेल्या धाडसाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मयुरच्या धाडसाचे कौतुक करत 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नवी मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकावरील हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सर्वजण त्याच्या या बहादूर कामगिरीला कडक सलाम करत आहेत. दरम्यान जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले आहे.

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच एका अंधमातेच्या चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी पॉईंटमनने मयुरने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचे अधिका-यापासून ते रेल्वेमंत्र्यापर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मयूरच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंच कौतुक केले आहे.

मयूर यांच्याजवळ खास ड्रेसकोड किंवा टोपी नाही. तरीही मयूर यांनी सुपरहिरोच्या तुलनेत अधिक धाडसी काम केल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ज्या अंध मातेच्या बाबतीत ही घटना घडली. त्या मातेनेही मयुरच्या धाडसाचे कौतुक केले आहे. मयूरमुळेच आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे. मयूर यांना एखादा पुरस्कार आणि गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी संगिता शिरसाट या अंध मातेने केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं असून मयूरवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. दरम्यान एशियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंटकडूनही शेळके यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.