‘Tour of Duty’ ला पााठिंबा ! अशा प्रशिक्षितांना नोकरीसाठी देऊ प्राधान्य : उद्योगपती आनंद महिंद्रा

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी 3 वर्षांची ‘Tour of Duty’ योजना सुरू करण्याबाबत लष्कराचे अधिकारी विचार करत आहेत. ही बातमी मला नुकतीच कळाली. या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे. लष्करी निकषांनुसार प्रशिक्षण घेऊन ही ‘Tour of Duty’ सेवा पूर्ण केलेल्या तरुणांना आमच्या उद्योग समूहात नोकरी देण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ असे मत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. लष्करी अधिकारी असे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत विचार करत असल्याचे कळाल्यावर महिंद्रा यांनी आनंद व्यक्त केला. तसंच तातडीने लष्कराला ई-मेल पाठवून आपली इच्छाही त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. ‘ ‘Tour of Duty’ पूर्ण करून हे तरुण जेव्हा ऑफिसमध्ये येतील तेव्हा त्याचा कंपनीला खूपच फायदा होईल. भारतीय लष्कराच्या कडक निवड आणि प्रशिक्षण परिमाणांंना अनुसरून प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना महिंद्रा उद्योग समूह नोकरी देण्याबाबत विचार करेल,’ असे त्यांनी लष्कराला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, तरुणांना देशसेवेची संधी देण्यासाठी व कौशल्यवान तरुणांना हेरण्यासाठी ‘Tour of Duty’ही योजना सुरू करण्याचा लष्कर विचार करत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर 100 अधिकारी आणि 1000 तरुणांना निवडून ‘Tour of Duty’ दिली जाईल, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे.