‘मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो’ असे म्हणत आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आणि त्यावरुन उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्यानंतर मनसे आणि भाजपने देखील ठाकरे सरकारवर टीका केली होती. मात्र, सोमवारी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

‘मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो’

आनंद महिंद्रा यांनी आज एक खास ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन न लावल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. अथक परिश्रम करणाऱ्या दुकान मालकांबद्दल मला वाईट वाटते. आता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरुन हे निर्बंधही लवकरात लवकर उठवण्यात येतील, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

वाद कसा सुरु झाला ?

आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या कारभाराबाबत वक्तव्य केलं होतं. लॉकडाऊनचा त्रास हा केवळ गरिबांना आणि छोट्या व्यावसायिकांना होत असतो. लॉकडाऊन हे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असतो. त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे ट्विट महिंद्रा यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांचा आनंद महिंद्रांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनामध्ये एका उद्योगपतीच्या वक्तव्याचा उल्लेख केला. या उद्योगपतीने लॉकडाऊन करण्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला दिला होता. आरोग्य सुविधा वाढवल्याच आहेत आणि त्या वाढवणे सुरुच आहे. पण केवळ आरोग्य सुविधा वाढवून चालणार नाही, तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची गरज आहे. आरोग्य सुविधा हाताळण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. त्यांचा पुरवठा हे उद्योगपती करणार का ? असा टोला मुख्यमंत्र्यांनी आनंद महिंद्रा यांना लगावला होता.