आनंद महिंद्रांना ‘हा’ शब्द ‘डिक्शनरी’मधून हटवण्यासाठी जायचंय कोर्टात ? जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील मोठे उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावरील आपल्या प्रतिक्रियांमुळे ओळखले जातात. ते ट्विटरवर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात. अलीकडे त्यांनी ट्विटरवर लॉकडाऊन आणि लष्कराच्या टूर ऑफ ड्युटी योजनेबद्दल आपले मते व्यक्त केले होते. आनंद महिंद्रा पुन्हा एकदा आपल्या ताज्या ट्विटसाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी अलीकडे प्रचलित झालेल्या वेबिनार या शब्दाबद्दल ट्विट केले होते.

वेबिनार शब्द शब्दकोशातून हटवण्यासाठी याचिका दाखल करू शकतो का ?- आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर मला वेबिनारसाठी आणखी एक आमंत्रण मिळाले तर मला एक गंभीर समस्या होऊ शकते. त्यांनी पुढे लिहिले की, हा शब्द शब्दकोषातून काढून टाकण्यासाठी याचिका दाखल करता येऊ शकते का ? महिंद्रा यांच्या या ट्विटवर एका युजरने खूप मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने तर असेही लिहिले की, आजकाल कोरोना व्हायरसपेक्षा वेबिनारपासून जास्त भीती वाटत आहे. त्याने लिहिले की, वेबिनारपेक्षा ऑफिसमध्ये जाऊन काम केलेले बरे.

वेबिनारचा उद्देश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा व्हिडिओद्वारे सेमिनारमध्ये किंवा सभांमध्ये भाग घेणे आहे. एका युजरने मजेदार पद्धतीने लिहिले की चार लोकांसह केलेला वेबिनार चारमीनार होईल. आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटनंतर युजर्सनी वेबिनार या शब्दाची तुलना चारमीनार आणि स्वामिनारशी केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘वेबिनार’ या शब्दामुळे माझा त्रास कमी करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी आणखी चांगले शब्द सुचवले आहेत.

त्यांनी लिहिले की, चेन्नई येथील एका गृहस्थांनी आयोजित केलेला एक वेबिनार वेबिनारायण असेल. एका गुरूने केलेला वेबिनार म्हणजे स्वामिनार असेल. यासाठी त्यांनी लोकांकडून आलेल्या विचारांचे स्वागत केले आहे.