दौंडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का ! आनंद थोरात, महेश भागवतांचा भाजपमध्ये प्रवेश, आ. राहुल कुल यांच्याकडून विरोधकांना ‘धोबीपछाड’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दौंड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला जबर धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या सोबत एकनिष्ठ काम करणाऱ्या आनंद थोरात आणि महेश भागवत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यामाध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी घडवून आणताना राहुल कुल यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज पाहायला मिळाले आहे कारण दौंड तालुक्यामध्ये याच दोन नेत्यांमुळे मोठी घडामोड घडली होती.

राहुल कुल यांचे वडील आणि दौंडचे माजी आमदार सुभाष अण्णा कुल यांनी १९९९ साली बहुजन समाजात मोठे स्थान असणाऱ्या आनंद थोरात आणि महेश भागवत यांची जिल्हा बँकेवर निवड व्हावी या साठी मोठे प्रयत्न केले होते आणि त्यावेळी सुभाषअण्णांचा शब्द मोडीत काढून आणि या दोघांना डावलून जयश्री खेडेकर यांना निवडून आणण्यात आले होते तेव्हापासून या दोघांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून कुल कुटुंबियांची लढाई सुरू होती. आनंद थोरात हे माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र असून दौंड तालुक्यामध्ये त्यांना धनगर समाजासह इतर समाजातील मानणारा मोठा वर्ग आहे तर महेश भागवत हेही दौंड पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भागवत पुत्र व माळी समाजाचे मोठे नेते आहेत.

आनंद थोरात आणि महेश भागवत हे भीमा पाटस कारखाण्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले होते त्यावेळी आनंद थोरात यांना व्हाईस चेअरमन हे पद मिळाले होते परंतु राहुल कुल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिल्यानंतर आनंद थोरात आणि महेश भागवत यांनी यांनी राष्ट्रवादीशी प्रामाणिक राहून आपल्या उपाध्यक्ष आणि संचालक या मोठ्या पदांचा राजीनामा दिला होता परंतु इतका मोठा त्याग करूनही राष्ट्रवादीकडून या दोघांचा मतदानापूरताच वापर होत गेला असा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. आनंद थोरात यांनी राष्ट्रवादीकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती व तसे वातावरणही होते परंतु राष्ट्रवादीने ऐन वेळी त्यांची उमेदवारी नाकारून रमेश थोरात यांना दिली त्यामुळे तालुक्यातील धनगर समाजसह इतर समाजातही मोठा असंतोष पसरला होता. रविवारी रात्री त्या असंतोषाचा मोठा उद्रेक होऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद थोरात, महेश भागवत, सदानंद थोरात, रफिक शिकीलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दौंड तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली असल्याने मतदारसंघात राजकीय समिकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षांची चांगलीच कोंडी झाली असून ही गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फटका निवडणूकीत बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. आपल्या या भूमिकेबाबत आनंद थोरात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयाबाबतची भूमिका समाजासमोर मांडणार आहेत.

Visit : Policenama.com