Pimpri News : पिंपरीतील ‘कोरोना’ हॉटस्पॉट कोरोनामुक्त, महिन्याभरात एकही रुग्ण नाही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले. मुंबईतील धारावी प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी परिसरात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना केल्या. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले असून पिंपरी-चिंचवडमधील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर, इंदिरानगर आणि साईबाबनगर या भागात मागील एक महिन्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

मुंबईच्या धारावी प्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीमध्ये दाटलोकवस्ती आहे. एकमेकांना लागून असलेल्या घरांमुळे याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. दाटीवाटीने राहणाऱ्या हजारो कुटुंबामध्ये सोशल डिस्टन्सिंगसह इतर निर्देशांचे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणे शक्य नव्हते. याशिवाय कुटुंबात चार ते पाच सदस्य असल्याने या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव रोखणे आरोग्य विभागासमोर एक आव्हान होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या भागामध्ये त्रिसूत्री अवलंबून कोरोनावर नियंत्रण मिळवले. महापालिकेकडून ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेट या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला. घरोघरी जाऊन तपासणी करुन रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयित रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला यश आले आणि हे तिनही कोरोना हॉटस्पॉट आज कोरोनामुक्त झाले आहेत.