वंचित बहुजन आघाडीमुळे पवारांनी माढ्यातून पळ काढला : आनंदराज आंबेडकर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. प्रचार सभेदरम्यान आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु आहे. अशातच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ‘माढा आणि सोलापूरची खरी लढाई भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या सरसेनापतीने पळ काढला आहे’ असे आनंदराज यांनी वक्तव्य केले आहे. सुरुवातीला माढ्यातुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी नंतर माघार घेतली. त्यावरून आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. मोहोळ येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

… म्हणून चौकीदाराचीच चौकशी करायला हवी

यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात, मात्र त्यांच्या काळातच अनेकांनी देशाला चुना लावून पळ काढला आहे. त्यामुळे चौकीदाराचीच चौकशी करायला हवी” अशी टीका आनंदराज आंबडकर यांनी केली.

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे तसेच भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी तोफ डागली आहे. ‘स्वतःला देव म्हणवून घेणाऱ्या महाराजांनी मंदिरात प्रवचन करावं, संसद हे महाराजांचे ठिकाण नाही, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रचार सभेदरम्यान बोलताना लगावला.