भाजपच्या गोटातूनच पेरल्या जातात युतीच्या बातम्या : आनंदराव अडसूळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्धार केला असून भाजपासोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. युतीसंदर्भातील सर्व चर्चा निराधार असून युतीच्या बातम्या भाजपच्याच गोटातून पेरल्या जात असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला. शिवाय, येत्या फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांची नागपुरात सभा होणार असून त्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या नागपुरातील सभेची तयारी सुरू आहे. सभेसाठी २ फेब्रुवारी ही तारीख ठरवली जाऊ शकते. या सभेचे आयोजन आणि पक्षबांधणीसंदर्भात जुना काटोल नाका चौकातील जंक्शन फंक्शन सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने, राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

मतभेद विसरून सर्वांनी एकोप्याने काम करावे, असे आवाहन नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत केले. शिस्तीने काम केल्यास यश मिळविता येते. सर्वांना सोबत घेऊन काम करा, असा सल्ला कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्वास कीर्तिकर यांनी व्यक्त केला.