हिंदूंच्या मुलींना स्पर्श करणारे हात उखडून फेका ‘या’ भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान  

कोडागू : वृत्तसंस्था – ‘जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका ‘असे वादग्रस्त विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले हेगडे या नव्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. यापूर्वी संविधानाविषयी देखील हेगडे यांनी वादग्रस्त विधान केले होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री हेगडे म्हणाले, ‘जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते. तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावं तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे, असंही अनंत कुमार हेगडे म्हणाले. तसेच ताजमहाल हे मुस्लिमांनी तयार केलेलं नाही. शाहजहाँनं ताजमहाल हा राजा जय सिंह यांच्याकडून विकत घेतला होता. ताजमहाल एक शिव मंदिर आहे, ज्याचा निर्माण राजा परमतीर्थ यांनी केला होता’.

ताजमहालचं पहिलं नाव तेजो महालय होतं. त्याच्यानंतर ताजमहाल असं नामकरण करण्यात आलं. टीपू जयंतीवरही हेगडे यांनी टीका केली आहे. ब्रिटिशांच्या काळात चार युद्ध लढणार टीपू सुलतान हा बलात्कारी होता. टीपू जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं हेगडेंनी स्पष्ट केलं आहे. जे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिजीवी समजतात, त्यांची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते.

संविधानाबाबत देखील वादग्रस्त विधान

गेल्या काही दिवसांपूर्वी हेगडे यांनी एका सभेमध्ये ‘आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत’ असे वादग्रस्त विधान केले होते. हेगडे यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उटली होती. कॉंग्रेससह सर्व विरोधी नेत्यांनी हेगडे यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर हेगडे यांनी लोकसभेत जाहीररीत्या माफी मागितली होती. ‘संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च असून त्यासंबंधी माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मी दिलगिरी व्यक्त करत आहे’ अशा शब्दात हेगडे यांनी माफी मागितली होती.