आयुष्मान भारत योजना ! 30 रूपयाच्या कार्डव्दारे ‘कॅन्सर’चे उपचार तसेच गुडघ्यावर शस्त्रक्रिया, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘आयुष्मान भारत योजनें’तर्गत तुम्हाला लवकरच मोठा लाभ मिळू शकणार आहे. लवकरच आयुष्मान भारत योजनेंतर्गत कॅन्सरवर उपचार आणि गुडघा बदलण्यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मात्र त्याचबरोबर आयुष्मान भारत अंतर्गत मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा बंद केली जाऊ शकते. सध्या या योजनेंतर्गत 1300 हून अधिक आजारांवर मोफत उपचार केले जातात.

समितीचा अहवाल –

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 1300 मेडिकल सुविधांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने एनआयटीआय आयोगाचे सदस्य प्राध्यापक विनोद के पॉल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीत आरोग्य सचिव आणि आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी सामिल आहेत. या समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. समितीच्या शिफारशीनुसार आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्करोग आणि गुडघारोपण शस्त्रक्रिया यासारख्या सुविधादेखील पुरविल्या जाऊ शकतात. समितीने रुग्णालयांना उपचारासाठी देय दरामध्ये बदल करण्याचीही शिफारस केली आहे. समितीच्या अहवालानुसार 200 पॅकेजचे पेमेंट वाढवता येऊ शकते आणि 63 पॅकेजचे देय कमी करता येऊ शकते.

मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा बंद केली जाऊ शकते –

विशेषज्ञ समितीने आयुष्मान भारत अंतर्गत देण्यात येत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान भारत यॊजनॆअंतर्गत आरोग्य सुविधांचा दुहेरी लाभ घेणाऱ्यांना रोखण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा इतर आरोग्य सुविधेअंतर्गत दिली जात आहे. ‘राष्ट्रीय अंधता निवारण’कार्यक्रमांतर्गतही सरकार मोफत मोतीबिंदू ऑपरेशन सुविधा पुरवत आहे. अशा परिस्थितीत आयुष्मान भारत अंतर्गत मोतीबिंदू ऑपरेशन सुविधा बंद केली पाहिजे. समितीने तयार केलेल्या शिफारसी 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत मांडल्या जातील. या शिफारसींबाबत अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात येईल.

आयुष्मान भारत योजना –

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थींच्या कुटुंबासाठी सुमारे एक ते दीड लाखापर्यंत आरोग्यविम्याची तरतूद करण्यात येते. त्यावरील आरोग्यसेवेची गरज पडल्यास त्याचा खर्च थेट राज्य सरकारमार्फत करण्यात येतो. या योजनेत फक्त उपचारादरम्यानचा खर्च धरण्यात आला नसून तुम्हाला उपचारापूर्वी आणि उपचारानंतर जो काही खर्च येईल तो ही दिला जातो. ही योजना संपूर्ण भारतभर स्थलांतरित करता येते. म्हणजे तुम्ही एका दवाखान्यातून भारतातल्या कोणत्याही अनुसूचित केलेल्या दुसऱ्या दवाखान्यात जरी गेलात तरी या योजनेचा फायदा घेता येईल. योजनेत होणारा खर्च हा संपूर्ण कॅशलेस आहे.

आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का? असा घ्या शोध –

तुम्हालाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रथम तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही याचा शोध घ्यावा लागेल. या योजनेतील आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव पाहण्यासाठी योजनेच्या https://www.pmjay.gov.in या वेबसाइटवर जा. यानंतर आपला मोबाइल नंबर टाका. नंतर कॅप्चा कोड टाका. ओटीपी नंबर जनरेट करा. त्यानंतर आलेला ओटीपी नंबर टाका. मग राज्य निवडा. त्याच्या नावाने किंवा जातीच्या श्रेणीनुसार शोधा. त्यानंतर, तुमचा तपशील टाका आणि शोधा.

दुसऱ्या पद्धतींनीही तुम्ही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे चेक करू शकता. त्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या 14555 किंवा 1800 111 565 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.

गोल्डन कार्ड कसे आणि कुठे बनवायचे

जर आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र असाल तर योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड मिळवू शकता. गोल्डन कार्ड रुग्णालयात आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसएसी) या ठिकाणी बनवले जातील. देशाच्या ग्रामीण भागात कॉमन सर्व्हिस सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये कार्ड बनवण्यासाठी काम सुरु झाले आहे. कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील. कॉमन सर्व्हिस सेंटर व्यतिरिक्त रुग्णालयांमध्येही मोफत कार्ड बनवले जातील.

आरोग्यविषयक वृत्त –