प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; कोरोनाचीही झाली होती लागण

नवी दिल्ली :वृत्त संस्था – प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले. ते गेल्या काही कालावधीपासून झी न्यूज या वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर म्हणून कार्यरत होते. सरदाना यांचे निधन झाल्याची माहिती झी न्यूजचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर चौधरी यांनी ट्विट करून दिली.

रोहित सरदाना हे आज तक वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या दंगल या शोचे अँकरिग करत होते. त्यांना 2018 मध्ये गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामध्ये त्यांचे निधन झाले. याबाबतची माहिती देताना सुधीर चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘काही वेळापूर्वी जितेंद्र शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जी बातमी दिली त्यानंतर माझे हात थरथरत होते. माझे मित्र आणि सहकारी रोहित सरदाना यांच्या मृत्यूची बातमी आली. हा व्हायरस आमच्यातील इतक्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जाईल, ही कल्पनाही केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवाकडून अन्याय आहे…ॐ शान्ति…’

दरम्यान, सध्याच्या कोरोना काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांसारख्या मुद्यांवर रोहित सरदाना सोशल मीडियावर आवाहन करत होते. कालच त्यांनी ट्विट करून एका महिलेसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. त्यापूर्वी 28 एप्रिलला त्यांनी प्लाज्मा डोनेट करण्याचे आवाहन केले होते.

राजदीप सरदेसाई यांच्याकडूनही ट्विट

‘माझ्या मित्रांनो, अत्यंत भयानक अशी ही बातमी. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले. त्यांना आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आला. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या आत्मास शांती लाभो….RIP’, असे ट्विट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले आहे.