…अन् तो फोन ठरला अखेरचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितला आठवणीतील किस्सा

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – २६/११ चा दहशतवादी हल्ला कधीही विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो, घटनेची माहिती समजताच पहिल्यांदा मी विजय साळसकर यांना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी घरातून निघत आहे, घटनास्थळी पोहोचत आहे. त्यानंतर काही वेळाने मी त्यांना पुन्हा फोन केला, पण तो फोन उचलला गेला नाही आणि दुर्दैवी घटना घडली. आज १२ वर्षे पूर्ण झाली. यापुढेही कित्येक वर्षे उलटतील पण काळजावर झालेली जखम कधीही भरून निघणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन व हिंमततुल्य या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. दरम्यान, शहिदांचे कुटुंबीय विनिता अशोक कामटे, स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपर्यंत सर्वांना पकडणारा पोलीस महत्त्वाचा घटक आहे. त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी हे महाराष्ट्र, मुंबईवर हल्लाच काय, पण मुंबईचे नावही घेऊ शकणार नाहीत. त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे सक्षमीकरण करू. पोलिसांची कामे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच राज्यात सर्वत्र राबविण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी दालन राहणार खुले
माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती झाल्याबद्दल पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी समाधान व्यक्त केले. या दालनात विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या ७९७ हुतात्म्यांची एकत्रित उपलब्ध आहे. तसेच विविध लघुपटांद्वारे पोलिसांच्या शौर्याची माहिती दिली जाते.सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.