अन् वधू-वराच्या हातावर पडले होम क्वारंटाईनचे शिक्के, वर्‍हाडात आढळला कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातून लग्नासाठी वर्‍हाडी निघाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या एकाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. सातारा जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्हा प्रशासनाला ही बाब तातडीने कळविली. त्यानंतर शासकीय ताफा चौकशीला पोहचण्यापूर्वीच वर्‍हाडीनी अगोदर मोजक्या लोकांमध्ये शुभमंगल केले. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी लग्नस्थळी पोहचले. त्यांनी सर्वांची तपासणी केली आहे. वधुवरासह सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. काही वेळापूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या त्या वधूवरांना आता १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. नीराजवळ असलेल्या गुळुंचे गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील या बातमीने तालुक्यात खळबळ माजली आहे. संबंधित कोरोना बाधित व्यक्ती वर्‍हाडी मंडळींच्या संपर्कात आली असल्याने आता दोन्ही पक्षांकडे लोकांमध्ये संशयित रुग्ण सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हा विवाह सोहळा ३० मे रोजी होणार होता. पण तो मंगळवारी करण्याचे ठरविण्यात आले. प्रशासनाने ५० जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली. मायणी येथील एका परिवारातील वर, तर पुरंदर तालुक्यातील एका कुटुंबातील वधू यांचा विवाह छोटेखानी कार्यक्रम नियोजित होता. मायणी येथून वर्‍हाड पहाटे सहा वाजता निघाले. सात वाजता वराच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. ती व्यक्ती वर्‍हाडात नव्हती; पण ते मागील काही दिवसांपासून या वर्‍हाड्यांच्या संपर्कात होते. या घटनेमुळे सातारा जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत ही माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवली. तसेच संबंधित विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली असताना अचानक शासकीय अधिकारी तेथे आले. वर्‍हाडातील लोकांना त्यांनी क्वारंटाईन करण्यासाठी मुळ गावी पाठविले. नवरदेव आणि मोजक्याच लोकांत साडेबारा मुहूर्ताऐवजी सकाळी साडेदहा वाजता सोशल डिस्टन्सिंग पाळत झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचार्‍यांनी प्रत्येकाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. नववधू आणि वराचीही तपासणी करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार होम क्वारंटाइनचे शिक्के हातावर मारण्यात आले आहे.