अंदमानमध्ये आदिवासींनी केली पयर्टकाची हत्या… 

अंदमान :वृत्तसंस्था  – अंदमान निकोबार बेटांवर आजही अशा आदिवासी जमाती आढळतात ज्यांचा आजतागायत अन्य लोकांशी संपर्क आला नाही. अंदमानमधील अशाच एका जमातीचे वास्तव्य असणाऱ्या बेटावर जाणे एका अमेरिकन पर्यटकाच्या जीवावर बेतले आहे. अंदमान मधील सेंटिनेली आदिवासी जमातीने या पर्यटकाची हत्या केली आहे. या पर्यटकाला बेटावर नेल्याप्रकरणी सात मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंटिनेली ही  द्वीपकल्पातील एक जमात आहे. त्यांचा अन्य लोकांशी संपर्क नाही. पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला ६४ किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर त्यांचे वास्तव्य आहे. या बेटावर पर्यटकांना प्रवेशबंदी असते. अमेरिकेत राहणारा जॉन अॅलेन हा साहसी पर्यटनासाठी अंदमानमध्ये आला होता. सात मच्छिमारांनी जॉनला सेंटिनेली बेटाजवळ नेले होते. यादरम्यान आदिवासी जमातीने जॉनवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मच्छिमारांना जॉनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी सात मच्छिमारांना अटक केली आहे.
सेंटिनली जमातीविषयी –
नॉर्थ सेंटिनेल बेटावर सेंटिनेली आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. त्यांची लोकसंख्या १०० (२०११) असून इतर नेग्रिटी वंशाच्या लोकांप्रमाणेच ते इतिहासपूर्व काळात येथे येऊन स्थायिक झाले असावेत. ते स्वत:ची सेंटिनेलिज बोलीभाषा बोलतात. या जमातीतले पुरुष एक वैशिष्ट्यपूर्ण सालीचा कमरपट्टा वापरतात. ते कृष्णवर्णीय, मध्यम उंचीचे व नेग्रिटो वंशीय बांध्याचे आहेत. ही जंगलातील कंदमुळे गोळा करणारी शिकारी निमभटकी जमात असून ते रानडुक्कर, समुद्री कासव, मासे इत्यादींची शिकार धनुष्यबाण तसंच भाल्याने करतात. मच्छीमारीसाठी आणि समुद्री कासव पकडण्यासाठी ते होडीचा उलंडी मचवा (डोंगी होड्या) वापर करतात. डुकराचे मांस, समुद्र कासवे, भिन्न प्रकारची मच्छी, फळे, कंदमुळे हे त्यांचे अन्न असते. त्यांचा १८५८ मध्ये ब्रिटिश वसाहतवाल्यांशी संघर्ष झाला. अखेर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ब्रिटिशांनी या प्रदेशातून काढता पाय घेतला होता. या आदिवासी जमातीचा अन्य लोकांशी संपर्क नाही. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो.
अंदमान निकोबार आदिवासी आणि पर्यटक संघर्ष 
आदिवासी आणि पर्यटक यांच्यातील संघर्ष ही काही नवी बाब नाही. अंदमान  निकोबार बेटांवर  ६५० अधिक जमाती आढळून येतात यातील बऱ्याच जमाती ह्या आफ्रिकेतून आल्या आहेत. आजही या जमाती अशाच अवस्थेत राहतात जसे त्या पूर्वीपासून राहत आहेत. कितीही डिजिटलायझेशन झाले तरी या जमाती आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. आनंदमान आणि निकोबार बेटांचे सौंदर्य पाहण्याकरिता पर्यटक येथे गर्दी करतात. पण तेथील आदिवासींना पर्यटकांकडून त्रास दिल्याच्या देखील अनेक घटना आहेत. यापूर्वी अर्धनग्न आदिवासी महिलेला नाच करायला लावून तिचा व्हिडीओ काढण्यात आला होता. या घटनेवर समाजातील सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.

अखेर बाॅलीवूडचे संस्कारी बाबू अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल