मुंबईतील ‘हा’ सर्वात मोठा भाग बनला ‘कोरोना’ हॉटस्पॉट, जाणून घ्या रुग्णसंख्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सुरुवातीला धारावीत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने धारावी हा भाग कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट होणार असे मत व्यक्त केले जात होते. मात्र, धारावीत कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. आता धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट नसून अंधेरी पूर्व हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येने 5000 चा आकडा पार केला आहे.

अंधेरी पूर्व हा मुंबईतील पहिला प्रभाग आहे ज्यात 5 हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर एस प्रभाग म्हणजे भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग पवई या भागात 4 हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. मुंबईत 5 वर्डात तब्बल चार हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच आता पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. लव अग्रवाल यांनी आज ठाणे आणि उत्तर मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी केलेल्या उपाय योजनांची पाहणी केली.

देशाच्या 8 राज्यांमधील कोरोनाचे 85.5 टक्के सक्रिय प्रकरणं आणि 87 टक्के मृत्यूचे प्रकरणं आहेत. मंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कोरोनाच्या मुद्यावर आज देशातल्या मंत्री गटाची 17 वी बैठक झाली. देशातील 8 राज्ये कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असल्याचे या बैठकीत सहभागी मंत्री व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. केंद्राने 15 उच्चस्तरीय गट तयार केले आहेत. जे राज्यांना तांत्रिक सहाय्य देण्याचे काम करीत आहेत.