JCB नं ‘कोरोना’ रूग्णांचे मृतदेह नेले स्मशानभूमीत, मुख्यमंत्री भडकले, 2 बडे अधिकारी तात्काळ निलंबीत

गुंटूर : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलममधून माणूसकीला काळीमा फासणारे वृत्त समोर आले आहे. कोरोना व्हायरसने पीडित दोन रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह खोदकाम करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जेसीबी मशीनने स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्यानंतर राज्य सरकारने कारवाई केली.

आंध्र प्रदेशचे सीएम वायएस जगमोहन रेड्डी यांनी यावर दु:ख आणि नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त करताना म्हटले की, हे निंदनीय असून अमानवीय आणि प्रोट्रोकॉलचे उल्लंघन देखील आहे. जबाबदार अधिकार्‍यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सीएमच्या आदेशानंतर संबंधीत नगरपालिका प्रमुख आणि एक अन्य अधिकारी यांना निलंबित केले आहे.

ट्विटरद्वारे सीएम जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले की, ही मानवता दाखवण्याची वेळ आहे, परंतु ज्या पद्धतीने काम करण्यात आले, त्यामुळे मन दुखावले आहे. अशा घटना पुन्हा कुठेही घडता कामा नयेत. जबाबदार लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल.

माहितीनुसार कोरोना पीडितांच्या मृत्यूनंतर शेजार्‍यांनी अ‍ॅम्ब्युलन्स येईपर्यंत वाट पाहण्यास नकार दिला. यानंतर तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना हे पाऊल उचलावे लागले, ज्याचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.