Video : न्यूज चॅनेलवरील Live चर्चेत गोंधळ, भाजपा नेत्याला फेकून मारली चप्पल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील एका तेलगु न्यूज चॅनेलवरील लाईव्ह चर्चेदरम्यान वाद झाला अन् चर्चेत सहभागी झालेल्या एका सदस्याने चक्क भाजप नेत्याला चप्पल फेकून मारल्याचा प्रकार मंंगळवारी (दि. 23) घडला. या घटनेमुळे लाईव्ह चर्चेचे प्रसारण करणार्‍या अँकरला ब्रेक घ्यावे लागले. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही घटना व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशातील जगन सरकारच्या 3 राजधानींच्या प्रस्तावानंतर अमरावतीत जवळजवळ काम थांबले आहे. राजधानीसाठी 434 दिवसांपासून शेतकरी व महिलांचे आंदोलन सुरु केले. असे असतानाही न्यूज चॅनलने मंगळवारी एक लाईव्ह चर्चा केली. या चर्चेत अमरावती प्रदेशच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपा प्रदेश सरचिटणीस विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर लोक राजधानी अमरावतीबाबतच्या चर्चेत सहाभागी होते. चर्चेदरम्यान भाजपाच्या विष्णुवर्धन रेड्डी यांनी डॉ. कोलिकापुडी यांचे तेलुगू देसम पक्षासोबत संबंध असल्याचा आरोप केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली. मात्र, जेव्हा विष्णुवर्धन रेड्डी वारंवार डॉ. कोलिकापुडी यांचे टीडीपीसोबत संबंध असल्याचा पुनरुच्चार करु लागले, तेव्हा डॉ. कोलिकापुडी यांचा संताप अनावर झाला अन् त्यांनी चक्क रेड्डी यांना चप्पल फेकून मारली.

दरम्यान भाजपाचे राज्य युनिटचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही घटनेचा निषेध केला. जर तेलुगू देसम पक्षाची यात कोणतीही भूमिका नसेल तर चंद्रबाबू नायडूंनी हल्लेखोर डॉ. कोलिकापुडी यांच्या या कृत्याचा निषेध करावा, असे म्हटले आहे.