मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना ‘धक्का’ ! थेट ‘विधान’ परिषद ‘बरखास्त’ करण्याचा ‘निर्णय’

अमरावती : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. रेड्डी यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये विधानसभा परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड्डी यांच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजूरी दिली असल्याची माहिती वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी दिली आहे. रेड्डी यांच्या निर्णयाला माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी विरोध केला आहे.

आज झालेल्या कॅबिनट बैठकमध्ये विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कॅबिनेटने मंजूरी दिली. कॅबिनेट बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य असून जगनमोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता आहे. असे असले तरी विधान परिषदेत चंद्राबाबू नायडू यांचे बहुमत आहे. या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. विधान परिषदेमध्ये रेड्डी यांच्या राज्याच्या तीन राजधान्यांचा प्रस्ताव अडकवण्यात आला. त्यामुळे या प्रस्तावाला विलंब होत आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा विरोध
कॅबिनेटच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधानमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून विरोध करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यामध्ये पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.