‘या’ राज्यात ‘विक्रमी’ ५ उपमुख्यमंत्री ; महिलेला दिले ‘गृहमंत्री’पद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्य घटनेत उपमुख्यमंत्री, उपपंतप्रधान ही पदे नाहीत. पण राजकीय सोय लावण्यासाठी अथवा विधानसभेतील संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी किंवा पक्षातील दोन गटांना खुश ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद देण्याची देशात टुम निघाली. काही राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्रीपद दिले गेले आहेत. पण, आंध्र प्रदेशाने हे सर्व मोडीत काढत चक्क पाच जणांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे पूर्ण बहुमत मिळविलेल्या मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना याची काहीही गरज नसताना त्यांनी हा विक्रम केला आहे.

आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सोमवारी सत्ताधीश झाले. मुख्यमंत्री जगन आणि त्यांच्या २५ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधी समारंभानंतर जगन यांनी लगेच खातेवाटप केले असून, पाच जणांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. आज त्यांनी पामुला पुष्पा श्रीवाणी (एसटी), पिल्ली सुभाषचंद्र बोस (बीसी), अल्ल कली कृष्णा श्रीनिवास ऊर्फ नानी (कापू), के. नारायण स्वामी (एससी) आणि अमजद बाशा (मुस्लिम) या पाच जणांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. जगन यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या बोस यांना महसूल खाते देण्यात आले आहे. नारायण स्वामी यांना उत्पादन शुल्क व व्यावसायिक कर, बाशा यांना अल्पसंख्याक विकास, श्रीवाणी यांना आदिवासी विकास आणि नानी यांना आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खाते देण्यात आले आहे.

आपल्या वडिलांप्रमाणे जगन यांनीही महिलेला गृहमंत्री केले आहे. मेकाथोती सुचरिता यांच्याकडे गृहखात्यासह आपत्कालीन व्यवस्थापन हे खातेही देण्यात आले आहे. २००९ मध्ये दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त केल्यानंतर वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी पी. सविता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्रीपद दिले होते. त्या तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला गृहमंत्री ठरल्या होत्या. बुगन्ना राजेंद्रनाथ यांना अपेक्षेप्रमाणे वित्तमंत्री करण्यात आले आहे.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी तसेच महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा सरकारवरील पगडा दूर करण्यासाठी भाजपाने गोव्यासारख्या छोट्या राज्यात दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र, जगन रेड्डी यांनी सर्व जातींना सामावून घेण्यासाठी व त्यांच्या सन्मानासाठी पाच उपमुख्यमंत्री केले आहेत.