काय सांगता ! होय, रूग्णाला चक्क Bigg Boss दाखवून यशस्वीपणे केली ‘ओपन ब्रेन सर्जरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  डॉक्टर एखादी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासाठी केवळ तंत्रज्ञान किंवा औषध-गोळ्यांवर अवलंबून नसतात, तर त्यांना इतर मार्गांचाही अवलंब करावा लागतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये डॉक्टरांनी असंच एक आगळंवेगळं ऑपरेशन केलं. गुंटूरमधील वृंदा न्यूरो सेंटरमध्ये 35 वर्षीय वारा प्रसाद यांच्यावर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्जरी करताना रुग्णाला शुद्धीत ठेवणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे डॉक्टरांनी एक आगळीवेगळी शक्कल लढविली.

शस्त्रक्रिया करताना रुग्णाने शुद्धीत राहावे म्हणून डॉक्टरांनी रुग्णाचा आवडता टीव्ही कार्यक्रम बिग बॉस सुरू केला आणि ओपन ब्रेन सर्जरी यशस्विरीत्या केली. या सर्जरीदरम्यान डॉक्टरांनी एक हॉलिवूडचा चित्रपटही रुग्णाला दाखवला. बिग बॉस संपल्यानंतर वारा प्रसाद यांना हॉलिवूडचा अवतार हा चित्रपट दाखवण्यात आला. रुग्ण वारा प्रसाद हे बिग बॉस आणि अवतार चित्रपट बघण्यात गुंतलेले असताना डॉक्टरांनी त्यांच्यावर यशस्विरीत्या सर्जरी केली. गुंटूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. शेषाद्री शेखर, डॉ. त्रिनाथ यांनी नवीन तंत्रज्ञान आणि मशिनचा वापर करून ही किचकट सर्जरी अधिक सोपी केली.

याआधीदेखील 2016 मध्ये वारा प्रसाद यांच्यावर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. पण ती सर्जरी यशस्वी झाली नव्हती, त्यामुळे गुंटूरमध्ये पुन्हा ही सर्जरी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे डोक्याचं ऑपरेशन करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते, कारण ती खूप किचकट शस्त्रक्रिया असते. दरम्यान, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.