नवा आदर्श ! फक्त 10 रुपयांत रुग्णांवर उपचार करणारी युवा डॉक्टर

कडप्पा (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था –  आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील एक युवा डॉक्टर फक्त १० रुपयांत रुग्णांवर उपचार करत आहे. सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेणं गरिबांच्या आवाक्या बाहेरचं ठरत आहे. रुग्णांकडून केवळ १० रुपये ‘कन्सल्टिंग फी’ घेऊन ती उपचार करते आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून केवळ ५० रुपये बेडची फी आकारली जाते. कडप्पा येथील गरीबांसाठी डॉ. नूरी परवीन देवदूत ठरत आहेत. २८ वर्षीय डॉक्टर नूरी परवीन समाजासाठी आदर्श ठरत आहे. डाॅ. परवीन यांचं प्राथमिक शिक्षण कृष्णा जिल्ह्यातील चल्लापल्ली येथे झालं आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या विजयवाडा येथे स्थायिक झाल्या. कडप्पा येथील के. फातिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून (FIMS) त्यांनी ‘एमबीबीएस’ पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

वैद्यकीय शिक्षण सुरू असताना डॉ. परवीन आपल्या सहकाऱ्यांसोबत अनाथालय आणि वृद्धाश्रमात जाऊन समाजसेवा करायच्या. डॉक्टरकी मिळवल्यानंतरही समाजासाठीच काहीतरी करायला हवं याच हेतून गरीबांना स्वस्तात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. डॉ. परवीन यांनी नुकतंच महिला स्वास्थ्य सुविधा देखील सुरू केली. यात गायनकलॉजीची तपासणी अवघ्या १० रुपयांत केली जाते. डाॅ. परवीन यांचे वडील मोहम्मद मकबूल हे उद्योगपती आहेत आणि तेही विविध चॅरटी कार्यक्रमात सहभाग घेत असतात. डॉ. परवीन यांचे आजोबा नूर मोहम्मद हे ८० च्या दशकात कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. रास्त दरात गरीब रुग्णांची सेवा केल्यानं डॉ. परवीन यांचं खूप कौतुक केलं जातं. डॉ. परवीन यांना आजही त्यांच्या ‘पॉकीट मनी’साठी वडिलांकडून पैसे घ्यावे लागतात. पण आपली मुलगी करत असलेलं काम पाहून डॉ. परवीन यांच्या वडिलांना त्यांचा अभिमान वाटतो.

डॉ. परवीन यांच्या क्लिनिकमध्ये एक लॅब, फार्मसीसह आणखी काही सुविधा आहेत. रुग्णाला तत्काळ अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली तर त्यांच्याकडे काही बेड्स देखील आहेत. गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना त्या इतर रुग्णालय किंवा डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात आणि त्यासाठीची धडपड देखील करतात. पैसे कमावणं हे माझं लक्ष्य नसून गरिबांची सेवा करुन पुण्य पदरात पाडून घेणं हे लक्ष्य असल्याचं, डॉ. परवीन सांगतात. डॉ. परवीन यांनी आपलं क्लिनिक कडप्पा येथे सुरू केलं आहे. गरीबांना फक्त १० रुपयांत सेवा देण्याची कल्पना जेव्हा डॉ. परवीन यांच्या आई-वडिलांना कळाली तेव्हा ते खूप आनंदी झाले, असं डॉ. परवीन सांगतात.