आंध्र प्रदेश : विजयवाडा येथील Covid-19 केअर सेंटरमध्ये भीषण आग, 7 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलमध्ये भीषण आग लागली. फायर टेंडरने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. हे हॉटेल कोविड सेंटर म्हणून वापरले जात होते. हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हॉटेल स्वर्ण पॅलेसमध्ये ही घटना झाली. हॉटेलमध्ये 40 लोक असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी कोरोनाचे 30 रुग्ण आणि 10 रुग्णालयातील कर्मचारी होते.

या अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे असे विजयवाडा पोलिसांनी सांगितले. बरीच मेहनत घेतल्यानंतर आगीवरही नियंत्रण मिळवले आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी स्वत: संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि जखमींना अधिक चांगले उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यासह त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हॉटेल एका खासगी रुग्णालयाने भाड्याने घेतले होते, प्राथमिक तपासात समोर आले आहे की येथे कोरोना रूग्णांना उपचारासाठी ठेवले गेले होते. सर्व जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासह जगनमोहन रेड्डी यांनी सर्व अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत व याचा रिपोर्ट थेट त्यांना देण्यासाठी सांगितले आहे.