काय सांगता ! होय, फक्त एका फोटोग्राफरमुळं संपुर्ण शहर हादरलं, 150 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कम्युनिटी स्प्रेड होण्याचा धोका जास्त वाढला आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा हे शहर एका फोटोग्राफरमुळे हादरले आहे. काकीनाडापासून 20 किमीवर असलेले गोल्लाला ममीददा हे गाव कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहे. या एकट्या गावात कोरोनाचे तब्बल 116 रुग्ण आहेत. या सगळ्या मागचे कारण एक फोटोग्राफर ठरला आहे.

संबंधित व्यक्ती फोटोग्राफर असून गावात विविध कार्यक्रमांना उपस्थित होती. या व्यक्तीमुळेच कोरोनाचा प्रसार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही व्यक्ती पेडापुडी मंडल, रामचंद्रपूरम,अनापर्ती,बिक्कावोलू आणि मंदेपेटा मंडल या गावात कार्यक्रमांसाठी गेली होती.

त्यानंतर या गावात तब्बल 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रामचंद्रपूरममध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात फोटो काढत असताना या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही व्यक्ती मास्कशिवाय या कार्यक्रमाला उपस्थित होती. या फोटोग्राफर व्यक्तीचा मुलगाही कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले होते.