महामार्गावर शेकडो गाड्या असताना अचानक कोसळली दरड (व्हिडिओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देवभूमी उत्तराखंडवर सध्या नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट असून मुसळधार पावसामुळे सतत भूस्खलन होत आहे. चमोली जिल्ह्यात अशीच एक मोठी घटना घडली. भूस्खलनामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला. गौचर येथील कॅम्पजवळ आज सकाळी भूस्खलन झाले. डोंगराचा एक मोठा भाग रस्त्यावर पडल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग जाम झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. सध्या महामार्ग रिकामा करण्यात येत आहे.

पिथौरागड जिल्ह्यातील झुला गावात ढगफुटीची घटना उघडकीस आली आहे. गावात दोन लोक अडकल्याची भीती आहे. असेही बोलले जात आहे की ढगफुटीमुळे 5 ते 6 घरांनाही याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचला आहे. मदतकार्य सुरू केले आहे. पावसाळ्यात पर्वतीय भागातील भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडत असतात.

गेल्या आठवड्यात पिथौरागडमध्ये ढगफुटीमुळे तंगा गावाचे मोठे नुकसान झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि पोलिसांच्या पथकाने कित्येक दिवस शोधमोहीम राबविली. त्यानंतर ढिगार्‍यातून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान अजूनही 6 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे 11 लोक ढिगार्‍या खाली अडकले असल्याची शक्यता आहे.