राजस्थानमध्ये अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार; 3 जणांना अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एका 17 वर्षीय अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनाी सांगितले आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीच्या आईने काल दुपारी मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची तक्रार नोंदवली. ही महिला तिच्या मुलीसह दौसा जिल्ह्यातील मंडवारी पोलीस स्टेशन हद्दीत राहत असून, तिचा पती परदेशात कामाला आहेत. तीन दिवसाआधी संध्याकाळी जेव्हा मुलगी एकटी होती तेव्हा अनिल किरोरी, धर्मेंद्र राजकेश आणि धारा मीना यांच्यासह पाच जणांनी तिला अज्ञात स्थळी पळवून नेउन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पीडित मुलगी एवढी घाबरलेली होती की दोन दिवस तिने आईला घडल्या प्रकारबद्दल काहीच सांगितले नाही. मुलगी जी बोलू शकत नाही, तिला असह्य वेदना होऊ लागल्याने तिने आईला हावभाव करून घडल्या प्रकाराबद्दल सांगितले. यानंतर तिच्या आईने  कुटुंबास माहिती दिली.

पोलिसांनी याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध सुरू केला, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पीडित मुलीचा जबाब इंटरप्रिटरच्या सहाय्याने नोंदवून घेण्यात आला आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.