Angarki Chaturthi 2021 : कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ? जाणून घ्या शुभ योग, महत्त्व आणि कथा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा सर्व गुणांचा ईश्वर आहे. गणपती बाप्पा हि बुद्धीची देवता मानली जाते. गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चरला तरी वातावरण एकदम आनंददायी, मंगलमय होऊन जाते. गणपतीला प्रेरणा देणारी देवतासुद्धा मानले जाते. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत आहे. गणपती उपासकाकंडून गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी अनेक गणेश व्रते केली जातात. संपूर्ण वर्षात तीन वेळा गणेश जयंती साजरी करण्यात येते. तसेच वरद चतुर्थी व्रत, दूर्वा गणपती व्रत, एकवीस दिवसांचे गणपती व्रत, कपर्दि विनायक व्रत, गणेश पार्थिव पूजाव्रत, गणेश चतुर्थी, वटगणेश व्रत, तिळी चतुर्थी व्रत, संकष्टहर चतुर्थी व्रत, अंगारक चतुर्थी व्रत, संकष्ट चतुर्थी व्रत यांसारखे अनेक व्रत सुद्धा करण्यात येतात.

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. सगळ्या व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हणतात. तसेच याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेसुद्धा म्हणले जाते. सन २०२१ मध्ये मंगळवार, ०२ मार्च २०२१ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी रात्री ०९ वाजून ५१ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. तसेच त्याच महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३१ मार्च २०२१ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मार्च महिना अतिशय शुभ मानला जात आहे कारण एकाच महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येण्याचा योग्य जुळून आला आहे. या अगोदर हा योग जानेवारी महिन्यात जुळून आला होता.

अंगारक संकष्ट चतुर्थी कथा
या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त गणेश पुराणात एक कथा सांगितली जाते. भारद्वाज मुनींना पृथ्वीपासून जास्वंदीच्या फुलासारखा लाल पुत्र झाला. त्याचे नाव भौम असे ठेण्यात आले होते. योग्य वेळी मुनींनी त्यास उपदेश करून गणेशाचा शुभ मंत्र दिला. त्यानंतर त्याने एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली. शेवटी त्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन माघ वद्य चतुर्थीला मंगळवारी दशभुज गणपतीने त्यास दर्शन दिले. गणेशाने त्यास वर देताना म्हटले की, ही तिथी सर्व संकाटाचे हरण करणारी व व्रत करणाऱ्यास इष्टफल देणारी होईल. हे भौमा, तू देवांसह अमृत प्राशन करशील व जगामध्ये मंगल या नावाने प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे व पृथ्वीपुत्र असल्याने तुला अंगारक असेही म्हणले जाईल. अशा प्रकारे भौमाने-मंगलाने-अंगारकाने केलेली संकष्ट चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला ‘मंगलमूर्ती” असे नाव दिले. यांनतर गणपतीला मंगलमूर्ती असे म्हणले जाते.

अधिक महिन्यातील अंगारक चतुर्थी
अधिक मासातील अंगारकी चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे कारण ती अंगारकी २१ वर्षातून एकदाच येते. तसेच ३३ महिन्यांत एकदाच अधिक मास येतो. म्हणजे २१ वर्षांत साधारणतः ७ अधिक मास येतात; अधिक मासामध्ये मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक म्हणजे २१ वर्षांमध्ये एकदाच अधिक मासात अंगारकी येते.

२०२१ मधील अंगारकी चतुर्थी
०२ मार्च २०२१ – मंगळवार – अंगारकी चतुर्थी

२७ जुलै २०२१ – मंगळवार – अंगारकी चतुर्थी

२३ नोव्हेंबर २०२१ – मंगळवार – अंगारकी चतुर्थी