अंगारकी चतुर्थीमुळे थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारक योगाचे औचित्य साधून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु पितृपक्षात हा योग आला असल्याने नेहमीपेक्षा खुप कमी संख्या दिसून आली.

पुणे शहरापासून जवळ असलेल्या पुणे सोलापूर महामार्गालगत हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र आहे. येथे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून भाविक श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. गाणपत्य सांप्रदायामध्ये मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे अasनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे गणपतीच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी मोठी गर्दी होते.

आज पहाटे चार वाजता मंदिराचे पुजारी अजय आगलावे यांनी विधिवत पुजा करुन मंदिर दर्शनासाठी खुले केले त्यानंतर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भाविकांना खिचडी वाटप केली तर चिंतामणी सेवा मित्र मंडळ यांच्यावतीने नायलॉनचा चिवडा वाटप करण्यात आला. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवला होता तसेच कापडी मांडव घालण्यात आला होता.तर व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे यांनी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

भाविकांना दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नितीन सुद्रीक, गणेश कर्चे, होमगार्ड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. तर मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षकांनी आपले काम योग्य पद्धतीने पार पाडले. सायंकाळी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. थेऊर ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.