रागाच्या भरात दुचाकीवर निघालेली युवती अडकली घाटात, पेट्रोल संपलं अन् मोबाईल झाला बंद ! पुढं झालं ‘असं’ काही

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून सुखवस्तू कुटुंबाच राहणारी एक 30 वर्षीय युवतीनं शनिवारी रात्री दुचाकीनं प्रवास सुरू केला. कुठे जायचं हे माहित नसताना ती थेट यवतमाळजवळच्या मडकोना घाटात पोहोचली. तिथं तिच्या दुचाकीचं पेट्रोल संपलं, मोबाईल स्विच ऑफ झाला. मध्यरात्री भररस्त्यात उभ्या असलेल्या तरुणीला ग्रामीण पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतलं.

नागपूर येथील एजन्सी प्लाझा पटेलनगर येथे ही तरूणी राहते. एम एच 31/एसडब्ल्यू-1449 या दुचाकीनं ही तरुणी यवतमाळकडे निघली होती. तिच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यानं ती मडकोना घाटात रस्त्याच्या बाजूला बसून होती. हा प्रकार ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्यानं पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. युवती बेवारस असल्याची सूचना नियंत्रण कक्षातून ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय शिरभाते यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ मडकोना घाट गाठला. महिला पोलीस शिपायाच्या मदतीनं त्या युवतीला ताब्यात घेण्यात आलं. जेव्हा चौकशी केली तेव्हा ती युवती कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हती. तिचा मोबाईल चार्ज करून संपर्क केला असता तिच्या कुटुंबियाकडून ओळख पटली.

ती युवती शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी गिट्टी खदाण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. या सर्व गोष्टींची खातरजमा करून रविवारी त्या मुलीला ग्रामीण पोलिसांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. त्यामुळं एक मोठा अनर्थ टळला. घरातला वाद नेमका कशामुळं झाला आणि ही युवती एकटीच का निघली होती हे प्रश्न मात्र कायम आहेत.