रागातून पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर घातली दुचाकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे खासगी वाहनांना बंद केलेल्या एअरपोर्ट रस्त्यावरुन जाउ न दिल्याच्या रागातून पोलीसांशी हुज्जत घालत एकाने पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर दुचाकी घातली. शुक्रवारी रात्री घडली असून, येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अब्दुल गुलाम रसूल पटेल (वय 38, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई सागर कोतवाल यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. दरम्यान, त्यांचा ताफा राजभवनकडे जाणार असल्याने एअरपोर्ट रस्ता काही काळ खासगी वाहनांना बंद केला होता. त्यावेळी एअरपोर्टच्या दिशेने आलेल्या अब्दुलने पोलिसांना नागपूर चाळीत जायचे असल्याचे सांगितले.

मात्र, पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा पुढे गेल्याशिवाय वाहतूक सुरु केली जाणार नसल्याचे पोलिसांनी अब्दुलला सांगितले. त्याचा राग आल्याने अब्दुलने बंदोबस्तावर असलेल्या एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाला अरेरावी केली. त्यानंतर पोलिस शिपाई सागरच्या अंगावर दुचाकी घालत जखमी केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

पुर्ववैमन्यासातून दत्तवाडीत टोळक्यांचा राडा…
पुणे – पुर्ववैमन्यासातून दत्तवाडीत आठ जणांच्या टोळक्यांनी चांगलाच राडा घालत दोघांवर कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यात चार वाहनांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी श्रीकांत मोरे (वय 22, रा. लक्ष्मीनगर, सहकारनगर ) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सात ते आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरातील असून, एकमेकांच्या ओळखीतील आहेत. यापुर्वी त्यांच्यात वाद झाले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास श्रीकांत आणि त्याचा मित्र सौरभ मोहोळ शाहू वसाहतीतील गल्ली क्रमांक पाचमध्ये गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी टोळके त्याठिकाणी आले. फिर्यादींशी पुर्वीच्या वादातून शिवागीळ करण्यास सुरूवात केली. तसेच, त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तर सोहेल शेखला दगड मारुन जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजविण्यासाठी एक रिक्षा आणि टेम्पोच्या काचा फोडल्या. तसेच दोन रिक्षांचे हूड फाडून वाहनांचे नुकसान केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शंकर सलगर हे करीत आहेत.

ओएलएक्सवरून कपडे खरेदी करणे पडले महागात
पुणे –
ओएलएक्सवरून कपडे खरेदी करणे एका तरुणाला चांगलाचे महागात पडले असून, सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावरून 6 हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना ओएलएक्सवर कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर क्यु.आर. कोड पाठविला. फिर्यादींनी क्यु.आर कोडलिंक उघडल्यानंतर त्यांच्या खात्यावरून 6 हजार 900 रुपये काढून त्यांची फसवणूक केली.

युपीआय कोड घेऊन 45 हजार काढले
पुणे –
बंद गाडी घेऊन जाण्याचा बहाणा करत एकाकडून बँकेचा युपीआय कोड घेऊन त्यांच्या खात्यावरून 45 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. तसेच, त्यांना बंद पडलेली गाडी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यासाठी एक फॉर्म पाठविला व तो भरून देण्याचे सांगितले. फिर्यादींनी फॉर्म भरला. त्यात बँकेचा युपीाय कोडही टाकण्यास सांगितले होते. हा युपीाय कोड घेऊन सायबर चोरट्यांनी त्यातून 45 हजार रुपये काढून फसवणूक केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like