‘सीरम’मधील आगीची घटना दुर्दैवी; माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत, PM मोदींकडून दु:ख व्यक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीत लागलेल्या आगीत गुरुवारी (दि. 21) पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये झालेली जीवितहानी अतिशय दु:खद आहे. या कठीण समयी माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबांसोबत आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची तब्येत लवकर सुधारावीत यासाठी माझ्या प्रार्थना, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत. तर सीरमच्या इमारतीत लागलेली आग आणि त्यामुळे झालेली जीवितहानी वेदनादायी आहे. माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो, अशा भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवारी (दि. 22) सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.