ना कोणतेही व्यसन, ना Non-Veg, शुद्ध शाकाहारी आहेत अनिल अंबानी; दागिने विकून देताहेत वकिलाची फी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अंबानी हे नाव उद्योग विश्वात मोठे आहे. अनिल आणि मुकेश या अंबानी बंधूंचे नावही सर्वांच्याच परिचयाचे असेल. कर्जामुळे अडचणीत सापडलेले रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी हे सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. मात्र, तुम्हाला अनिल अंबानी यांच्या लाईफस्टाईलबद्दल माहीत आहे का? पण आता याची माहिती अनिल अंबानी यांच्याकडून देण्यात आली आहे.

लंडनच्या कोर्टात अनिल अंबानी यांच्याकडून सांगण्यात आले, की ते अत्यंत साधे जीवन जगतात. त्यांची जीवनशैली मोठी नाही. अनिल अंबानी हे जन्मापासूनच शाकाहारी आहेत. ते कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत. ते शहराच्या बाहेर जाण्याऐवजी मुलांसोबत बसून फिल्म पाहतात. अनिल अंबानी फक्त एकच कार चालवतात. सध्या त्यांचे कुटुंबीयच अनिल अंबानी यांचा खर्च उचलत आहेत.

दागिने विकून देताहेत वकिलाची फी

अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच बिघडली आहे. त्यांच्याकडे वकिलाची फी भरण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे ते सध्या दागिने विकून वकिलाची फी देत आहेत.

चीनच्या 3 बँकांचे कर्ज

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन (RCom)ने चीनच्या 3 सरकारी बँकांकडून कॉर्पोरेट कर्ज घेतले होते. मात्र, रिलायन्स कम्युनिकेशनला हे कर्ज फेडता आले नाही. त्यामुळेच या प्रकरणी लंडनच्या एका कोर्टात सुनावणी सुरु आहे. याच सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांच्या जीवनशैलीबाबत माहिती मिळाली.