अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत 38 बँकांना मोजावी लागणार आहे. कारण या बॅंकानी रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीला तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. त्यामुळे भीतीने सध्या बँकांचा जीव टांगणीला लागला आहे.

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने रिलायन्स कम्युनिकेशनने सध्या असलेल्या स्पेक्ट्रमची विक्री ही सरकारची थकबाकी फेडल्यानंतर करता येईल, असा आदेश दिला आहे. मात्र, या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला कर्ज देणाऱ्या धनकोंच्या समितीने यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. यावर आता न्यायालय काय निकाल देते हे पाहणे महत्वाचे आहे. समायोजित रक्कम म्हणून रिलायन्स कम्युनिकेशनने दूरसंचार खात्याचे 26 हजार कोटी थकवले आहेत. रिलायन्सच्या कर्ज फेडीच्या योजनेला धनकोंनी मंजुरी दिली होती. मे 2020 पासून हा प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. रिलायन्स कम्युनिकेशनला 38 बँकांनी 40 हजार कोटीचे कर्ज दिले आहे. तर चायना डेव्हलपमेंट बँकेच्या नेतृत्वात चीनी बँकांनी 9 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तसेच एसबीआयने 3 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तर एलआयसीचे 3 हजार 700 कोटी रिलायन्स कम्युनिकेशनने थकवले आहेत. जून 2017 पासून रिलायन्सने एक रुपयांचीही परतफेड केलेली नाही. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनला कर्ज देणाऱ्या बँकांचे लक्ष आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे.