भाजप खासदाराची माजी सैनिकाला मारहाण, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेला घेरले असतानाच आता राज्यातील आघाडी सरकारने भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षापूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगली कोंडी होण्याची शक्यता आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 2016 साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हा भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे देशमुख यांनी म्हटलं आहे.

2016 साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. यानंतर 2019 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे. भाजपने निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर आंदोलन सुरु केल्याने आता भाजपच्याच खासदाराने माजी सैनिकाला मारहाण केल्याचं प्रकरण उघड झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

एका माजी सैनिकाला न्यायाकरिता गेली चार वर्षे दारोदार भटकावे लागले. फडणवीस सरकारने दबाव आणून त्यांना छळ छळ छळले, जेलमध्ये टाकले, तडीपार केले. आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार सोनू महाजन यांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.