गृहमंत्री पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी? ‘ही’ नावे देखील चर्चेत

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखावर हप्ता वसुलीचा गंभीर आरोप लावला होता. या आरोपामुळे देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र आता गृहमंत्री पदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे गृहमंत्रिपदाचा कार्यभार राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात येणार याबाबत उत्सुकता आहे.

गृहमंत्री देशमुखांवरील आरोपाच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारने माजी न्यायमूर्तींची कमिटी स्थापन केली होती. परंतु या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत हायकोर्टात सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपने आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर राजकीय घडामोडींमध्ये अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पवारांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर देशमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर आता गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांनी आर. आर. पाटील यांच्यानंतर गृहमंत्रिपदाचा कारभार सांभाळला होता. कठीण काळात जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तर आरोग्यमंत्री टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे अनेकजण कौतुक करतात. हे दोन्ही नेते शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत. तसेच या शर्यतीत हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.