‘…म्हणून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांचा परमबीर सिंग यांच्यावर निशाणा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने सापडलेली स्कॉर्पिओ, स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन प्रकरणावरुन राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लेटरबॉम्ब टाकला. यामध्ये त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर देखील हे प्रकरण संपले नाही. आता अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यांनी बदली केल्याच्या रागातून माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बदली केल्याने माझ्यावर आरोप

आपली बाजू मांडताना अनिल देशमुख म्हणाले, घाडगे, सोनु, डांगे, जालन, केतन अशा अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी परमबीर सिंग यांच्या विरोधात येत आहेत. ते मुंबईचे पोलीस आयुक्त असताना अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडणं किंवा मनसुख हिरेन यांची हत्या होणे या दोन्ही घटनांच्या बाबतीत परबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती. परमबीर सिंग यांनी अतिशय गंभीर चूका केल्या. त्या चुका माफ करण्याच्या लायक नव्हत्या. म्हणून मी त्यांची बदली केली, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

त्यांनी पदावर असताना आरोप करायला पाहिजे होते

बदली केल्याच्या रागातून परमबीर सिंग यांनी माझ्यावर गंभीर आरोप केल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. ते पुढे म्हणाले, मी एका कार्यक्रमात देखील यासंदर्भात सांगितले होते की, परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची संशयास्पद भूमिका होती. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप केले. परमबीर सिंग यांना आरोपच करायचे होते तर मग त्यांनी पदावर असताना आरोप करायला पाहिजे होते. गेल्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप झालेला नाही. त्यामुळेच मी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, असेही देशमुख यांनी सांगितले.