दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अनिल देशमुख यांचे ट्विट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दिलीप वळसे-पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांच मन:पूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा !, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आज मंत्रालयात दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलीस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुणाच्या काय निष्ठा आहेत याची माहिती घेऊ. त्यानंतर जसं जसं आवश्यक असेल तसा निर्णय घेऊ, असे वळसे पाटील म्हणाले.

IPS लॉबीवर अंकुश ठेवणार ?
IPS लॉबी सरकारविरोधात काम करत आहे. ते विरोधकांना माहिती देत आहेत, यावर काय करणार ? असा प्रश्न् वळसे पाटील यांना विचारण्यात आला. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यातून कसा मार्ग काढायचा आणि कामात सुधारणा कशी होणार या संदर्भात विचार केला जाणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.