Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये महिलांवरील आत्याचार, कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ‘इशारा’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काहीपुरुष महिलांवर अत्याचार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.संबंधित तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष घरात बसून आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची गंभीर दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. लॉकडाउनमुळे कुणी गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाई चे निर्देश पोलीसांना दिले आहेत. या काळात आपल्याला कोण अटकाव करणार असा उद्दामपणा करीत महिला हिंसाचाराचे प्रकार केले जात आहेत.

एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई केली जाणार आहे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही स्त्रियांचा असा छळ केल्यास पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. सरकार अशा पीडीत स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. हिंसाचाराविरुद्ध महिलांना न्याय देणारा कायदा कठोर आहे आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे केली जाईल. महिलांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी पुरुषांनी पृाधान्य द्यावे. तसे न झाल्यास कायद्याचा बडगा उगारावाच लागेल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.