फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ’15 फेब्रुवारीला देशमुख आयसोलेट नव्हते तर त्यांनी अनेकांची भेट घेतलीयं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनः गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात त्यांनी अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाही तर यासंदर्भात शरद पवारानांही चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले. त्यामुळे आता देशमुख एक्सपोझ झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस मंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंंगाच्या खळबळजनक आरोपानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबत पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन, परमबीर सिंगांनी देशमुखांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हणत, सिंग सांगत आहेत त्या काळात देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते, असे म्हटले होते. मात्र यानंतर फडणवीसांनी ट्विट करून पवारांच्या दाव्यांचीही पोलखोल केली होती. त्यानंतर आता फडणवीस यांनी 15 तारखेची गृहमंत्र्यांची कार्यक्रम पत्रिका दाखवत म्हणाले, 15 तारखेला देशमुख एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेपासून ते आपल्या घरी होते. मात्र, माझ्याकडे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा कागद आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारी एक तारीख आहे. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील, असे म्हटले आहे. यानंतर 24 तारखेला पुन्हा देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच, असा माझा दावा नाही, असेही फडणवीस म्हणाले.