CBI च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थान, कार्यालये मिळून अशा दहा ठिकाणी आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) धाडी टाकल्या. या छापेमारीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून केला होता. त्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयकडून आज त्यांच्याशी संबंधित अशा 10 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी मोजक्या शब्दांत ट्विट करून प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे’.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये सीबीआयने झाडाझडती घेतली. सीबीआयच्या या कारवाईनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर अनिल देशमुख आले होते. त्यांनी यावर जास्त काही बोलणे टाळले. सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हफ्ता वसूलीवरून द्यावा लागला होता राजीनामा

अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदावर असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर हफ्ता वसूलीचे गंभीर आरोप केले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, जेव्हा हे प्रकरण सीबीआयकडे गेले. त्यानंतर त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता.