अनिल कपूर खांद्यांच्या दुखण्याने त्रस्त 

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हे सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहेत. अनिल कपूर यांना कॅल्सीफिकेशन ऑफ शोल्डर हा आजार झाला असून  एप्रिलमध्ये उपचारासाठी ते जर्मनीला जाणार आहेत. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूर यांनी आपल्या आजाराबद्दल सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून माझ्या उजव्या हाताच्या खांद्यात कॅल्शिअम जमा झाले आहेत. यामुळे माझे खांदे जाम झाले आहेत. त्याच्या उपचारासाठी मला जर्मनीला जावे लागेल. तेथे डॉ. मुलर वॉल्फहार्ट माझ्यावर उपचार करतील. खांदे जाम झाल्याने अ‍ॅक्शन सीन्स करताना मला प्रचंड वेदना होतात. त्यामुळे मला लवकरात लवकर याचा इलाज करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी अनिल कपूर याच आजाराने त्रस्त झाले होते. त्यावेळी डॉ. मुलर यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते.

अनिल कपूर सध्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अनिल कपूर व सोनम कपूर ही बापलेकीची जोडी प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर व सोनम कपूर शिवाय जुही चावला, राजकुमार राव यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.